बोलीभाषा एकांकिका स्पर्धा २०२४ Form
बोलीभाषा एकांकिका स्पर्धा महाराष्ट्रातील एकमेव नाट्यस्पर्धा, जी संपूर्णपणे मराठीच्या प्रादेशिक बोलींवर आधारीत आहे (मालवणी, कोकणी, घाटी, वऱ्हाडी, आगरी, कोळी, सातारी, मराठवाडी, खानदेशी, झाडी आणि अशा मराठीच्या जवळजवळ ५६ बोली) मराठी भाषेतल्या प्रादेशिक बोलींची स्वतंत्र एकांकिका स्पर्धा असावी, या वेगळ्या विचारातून ही आगळीवेगळी "बोलीभाषा एकांकिका स्पर्धा" अस्तित्वात आली.
प्रसिद्ध मालवणी नाटककार 'वस्त्रहरण'कार गंगाराम गवाणकर यांनी या स्पर्धेची संकल्पना मांडली. 'हृदयाची भाषा - बोली भाषा' ही या स्पर्धेची टॅग लाईन! नाट्य निर्माते गोविंद चव्हाण यांनी या संकल्पनेला मूर्त रुप दिले आणि त्यांच्या सुप्रिया प्रॉडक्शन्सच्या माध्यमातून २०१६ साली "बोलीभाषा एकांकिका स्पर्धा" सुरू झाली.
पहिल्याच वर्षी या स्पर्धेला महाराष्ट्रभरातून २८ हून अधिक प्रवेशिका आल्या. २०१७ मध्ये ३९ एकांकिका होत्या तर २०१८ साली तब्बल ४८ प्रवेशिका आल्या, ज्यामुळे अंतिम फेरीसाठी चक्क ९ एकांकिका निवडल्या गेल्या. त्यानंतरही प्रवेशिकांची संख्या वाढतीच राहिली. २०२२ मध्ये तिकीट काढून हाऊसफुल्ल झालेली कोविड काळानंतरची ही पहिली एकांकिका स्पर्धा होती.
हे स्पर्धेचे ७ वे वर्ष आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी ५० हून अधिक संघांचा सहभाग आणि ५०००+ (ऑफलाइन) व २५०००+ (ऑनलाइन) प्रेक्षकांचा प्रतिसाद अपेक्षित आहे. पहिल्या वर्षापासूनच या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता याही वर्षी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळेल, हे नक्की!
अनेक वृत्तपत्रांनीही या स्पर्धेबद्दल प्रशंसोद्गार काढले आहेत. प्रेक्षक, सहभागी कलाकार आणि शीर्षक प्रायोजकत्वापासून पारितोषिक प्रायोजकत्वापर्यंत सहकार्य करणारे आमचे सर्व प्रायोजक, अनेक नामवंत कलाकारांची उपस्थिती, प्रसिद्ध ब्रॅण्ड्सचा पाठिंबा या सर्वांच्या सदिच्छांनी या स्पर्धेची मुळे मजबूत झाली आहेत.